ठाकरे सरकार मुदतीपूर्वी पडणार: चंद्रकांत पाटील


पुणे: ठाकरे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. अंतर्गत मतभेदांमळे ते मुदत पूर्ण करण्यापूर्वीच पडेल, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना वर्तविले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार एक महिन्यात आपले पहिले वर्ष पूर्ण करीत आहे. मात्र, जनता या सरकारच्या कामावर नाराज असून आत्ता निवडणुका झाल्या तर ९० टक्के मतदार भाजपाला मत देतील, असा दावा पाटील यांनी केला.

हाथरस येथील अत्याचार आणि हत्येसारखीच घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात घडली. हाथरस येथे काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी यांनी धाव घेतली तशी ते पारोळा येथे घेणार का, असा सवालही पाटील यांनी केला.

बिहार विधानसभा आणि अन्य ठिकाणच्या पोटनिवडुकीतील यशानंतर भाजप महाराष्ट्रात सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नावर ते म्हणाले की, सरकार पाडण्याची आमची संस्कृती नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्यास तयार आहोत. मात्र, महा विकास आघाडीच्या आपसातील कुरबुरीच हे सरकार पडण्यास कारणीभूत ठरतील, असे पाटील म्हणाले.