राज्य सरकारचा शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई – राज्य सरकारकडून मुंबई व उपनगरातील शालेय शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भातील निवेदन पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरु करणार असल्याचे सरकारकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

इयत्ता 9 आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात शाळा सुरु करण्यात येतील. इयत्ता 1 ते 8 साठी शाळा लगेचच सुरु केल्या जाणार नाहीत. त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु राहतील, अशी माहिती यापूर्वी शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली होती, तसेच शाळा 50% शिक्षक क्षमतेवर सुरु करण्यात येणार असून त्यांच्यासाठी विशेष नियमही लागू करण्यात येणार आहेत.


मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी शालेय शिक्षकांना मिळाली असली तरी सर्वसामान्यांच्या प्रवासाबद्दल अद्याप राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून राज्यात टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण धार्मिक स्थळे, मंदिरे, प्रार्थना स्थळे यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेण्यात येईल, असे शुभसंकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी बोलताना दिले होते.