बिहार निवडणुकीच्या निकालानंतर अमृता फडणवीस यांनी साधला शिवसेनेवर निशाणा


मुंबईः बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. नितिश कुमार यांच्या जदयूपेक्षा बिहार निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना बिहारमधील या यशाच श्रेय दिले जात आहे. तर, बिहारमध्ये शिवसेनेला काही जागांवर नोटापेक्षाही कमी मत मिळाली आहेत. यावरूनच शिवसेनेला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ ट्विट करत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यामध्ये बिहारमधील निवडणुकीतील कामगिरीबद्दल फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात युती केल्याचा परिणाम बिहार निवडणुकीवर झाला आहे. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेसबरोबर गेल्याने बिहारमध्ये काँग्रेसचे व्होट बँक कमी झाले. तर, काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या आधी जागा तरी येत होत्या आता तर ते ही झाले नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनीही यावरूनच शिवसेनेला डिवचले आहे.


अमृता फडणवीस यांनी टीका करताना शिवसेनेचा उल्लेख शवसेना असा केला आहे. त्याचबरोबर, शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय, अशी टीका केली आहे. शिवाय, महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी बिहारमधील मतदारांचे आभार मानले.