आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्याआधी या नियमांवर एक नजर जरुर टाका


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरू करण्यासाठी निर्देश दिले आहेत. यासाठी त्यांनी योग्य ती सुरक्षा आणि खबरदारी बाळगण्यास सांगितले आहे. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची तपासणी इत्यादी खबरदारी घ्यायची आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना काळात क्वारंटाईन सेंटर्स सुरू केली होती, ती सुरूच राहतील. पण तेथील वर्गांसाठी इतरत्र जागेची व्यवस्था स्थानिक प्रशासनाला करायची आहे. शिक्षण विभागाने यासाठी नियमावली तयार केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील शाळा मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे सुरू होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिवाळी सुटीनंतर आता 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू होतील. पण शासनाच्या या आदेशाची प्रत अद्याप जिल्हा परिषद शिक्षण विभागाला मिळालेली नाही. सुरक्षीततेची योग्य काळजी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे, निर्देश शासनस्तरावरून देण्यात आल्याने काही जिल्हांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. शाळा शासन निर्णयाप्रमाणे सुरू करण्यासाठीची सर्व नियमावली देण्यात आली आहे. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची यासाठी चाचणी बंधनकारक केली आहे.

एकदा या शासन नियमावलीवर नजर जरुर टाका

 • शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल अशा प्रकारची बैठक व्यवस्था करावी.
 • एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे व्यवस्था असावी.
 • सोशल डिस्टन्सिंग नियमांच्या अंमलबजावणीसाठी विविध चिन्हे, खुणांचा वापर करण्यात यावा.
 • स्नेह संमेलन, क्रीडा वा अन्य तत्सम गर्दी होणारे कार्यक्रम शाळेत आयोजित करू नयेत.
 • शिक्षक-पालक बैठका ऑनलाइन घ्याव्यात.
 • विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल.
 • विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
 • कोरोना विषयक जनजागृती करणे.
 • शाळा व परिसर निर्जंतुकीकरणविषयक सुविधा सुनिश्चित करणे.
 • शाळेत क्वारंटाइन सेंटर असेल तर स्थानिक प्रशासनाने ते इतरत्र हलवणे. ते तेथून इतरत्र हलवणे शक्य नसेल तर शाळा इतरत्र किंवा खुल्या परिसरात भरवावी.
 • 17 ते 22 नोव्हेंबर 2020 यादरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल.
 • जे शिक्षक कोरोनाबाधित असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे.
 • आपत्कालीन, स्वच्छता पर्यवेक्षण आदी विविध कामांसाठी कार्यगट स्थापन करणे.

शाळा सुरू झाल्यानंतरची नियमावली

 • दररोज विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांचे थर्मल स्क्रिनींग करावे.
 • एक दिवसाआड विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील. म्हणजेच 50 टक्के विद्यार्थी शाळेत तर 50 टक्के विद्यार्थी ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहतील.
 • गणित, विज्ञान, इंग्रजीसारखे कोअर विषय शाळेत तर अन्य विषय ऑनलाइन शिकवावेत.
 • ऑनलाइन आणि ऑफलाइनचे वेळापत्रक तयार करावे.
 • शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा.
 • शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या आदी वारंवार निर्जंतुक कराव्यात.
 • हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हँडवॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. अल्कोहोलमिश्रित हँड सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावे.
 • स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुक करावीत.