दुकानदारांना कोणत्याही गॅरंटीशिवाय १ हजार कोटींचे कर्ज देणार Paytm


नवी दिल्ली – पुढील वर्षी मार्चपर्यंत दुकानदारांना एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्याचे लक्ष्य पेटीएमने ठेवले असून दुकानदारांना कर्ज देण्याच्या योजनेअंतर्गत कोणत्याही गॅरंटीशिवाय बिझनेस अॅप्स वापरकर्त्यांना कर्ज देणे सुरू ठेवणार असल्याची माहिती पेटीएमने सोमवारी दिली.

आपल्याकडे सध्या १.७ कोटी दुकानदार असून व्यवसाय क्षेत्राला त्या आधारावर १ हजार कोटी रूपयांचे कर्ज देण्यात येईल. दुकान मालक या कर्जाच्या रकमेद्वारे आपला व्यवसाय डिजिटल करू शकतील किंवा व्यवसाय चालवण्यासाठी निराळ्या मार्गाचा अवलंबही करू शकतील. दुकानदारांची कार्यक्षमता यामुळे सुधारेल आणि त्यांना डिजिटल भारत या मोहिमेतही सहभागी होण्यास मदत मिळेल, असे पेटीएमने एका निवेदनाद्वारे सांगितले.

कंपनीकडून सध्या मार्च महिन्यापर्यंत १ हजार कोटी रूपयांपर्यंतचं कर्ज वितरित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पेटीएम दुकानदारांच्या दररोजच्या देवाणघेवाणीवर त्यांना किती कर्ज द्यायला हवे याची निश्चिती करत असते. त्यानंतर एनबीएफसी आणि बँकांसोबत भागीदारीत काहीही तारण न ठेवता त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.