बिहारमध्ये आता जंगलराज नाही तर मंगलराज सुरू होईल – संजय राऊत


मुंबई – बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरूवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला कौल मिळताना दिसत आहे. एनडीए आणि महाआघाडीत सध्या अटीतटीची लढत सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पण महाआघाडी काही जागांनी एनडीएच्या पुढे आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुरूवातीच्या कलांवर भाष्य करताना तेजस्वी यादव यांचे राज्य येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना म्हणाले, निकाल अजून पूर्ण यायचे आहेत. आतापर्यंतचे जे कल पाहिले आहेत. त्यावरून एका तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन जी ताकत उभी केली आहे. आता अटीतटीची लढत आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल, याची मला पूर्ण खात्री आहे. संपूर्ण निकाल जेव्हा हाती येईल, तेव्हा बिहारमधील नागरिक जंगलराज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू झालेले असेल.

राऊत पुढे म्हणाले, बिहारमध्ये सर्वात वेगवान तेजस्वी, तेजस्वींच्या समोर पंतप्रधान, त्यांची फौज, केंद्रीय मंत्रिमंडळ, नितीश कुमार यांचे सरकार. सत्ता, संपत्ती, ताकद संपूर्ण होते. पण एका तरुण मुलाने सगळ्यांसमोर ज्या पद्धतीने आव्हान उभे केले. ज्याप्रमाणे तो बिहारमध्ये लढत आहे. मला वाटत हा एक चांगला संकेत आहे. बिहारमधील जंगलराजविषयी बोलले जात होते. नितीश कुमार यांचे १५ वर्षांपासून सरकार होते. मग कोणते जंगलराज बिहारमध्ये होते. मला वाटते ते जंगलराज संपवून आज तेजस्वींच्या नेतृत्वात मंगलराज सुरू होईल, असे म्हणाले.