अर्णब गोस्वामी प्रकरणी राज्यपालांनी दिलेल्य निर्देशांना गृहमंत्र्यांचे उत्तर


मुंबई – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. भाजप आणि राज्य सरकार यांच्यात सध्या त्यावरुन वाद सुरु आहे. तर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या वादात उडी घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करत अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी द्यावी आणि भेटू द्यावे अशा सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. तसेच, त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या आरोग्याबाबत चिंताही व्यक्त केली होती.

त्याला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोन आला होता. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटू द्या, असे त्यांनी सांगितलं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व जेलमध्ये कोणत्याही कैद्याच्या नातेवाईकांना जेलमध्ये जाऊन भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे अर्णब यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये जाऊन भेटता येणार नाही. पण ते फोनवर अर्णब यांच्याशी बोलू शकतात, असे म्हटले आहे.

अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. जो निर्णय घ्यायचा आहे तो न्यायालय घेईल, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. जेलमध्ये फोन वापरण्याची मुभा आहे. पण त्याकरिता जेल प्रशासनाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते. अर्णब यांना त्यांचे नातेवाईक किंवा वकील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत. पण फोनवर ते बोलू शकतील, असं अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.’याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. अर्णब यांना मारहाण झाली का? याबाबत बोलता येणार नाही. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप यात इंटरेस्ट घेत असल्याचा टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे.