दिलासादायक; तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीत Pfizerची कोरोना लस 90 टक्के परिणामकारक


नवी दिल्ली – संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलेले असतानाच संपूर्ण जगालाच दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. औषध उत्पादक कंपनी फायझरने (Pfizer) ने तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीत 90 टक्के परिणामकारक असल्याचे समोर आले आहे. जगातील अनेक देशांना या बातमीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व काही ठीक असल्यास या महिन्याच्या अखेरीस कंपनीला लस विक्रीची मान्यता मिळू शकते. जागतिक महामारी रोखण्यासाठी ही नक्कीच खूप आशादायी बातमी आहे. ही कोरोना प्रतिबंधक लस फायझर आणि बायोटेक एकत्रितरित्या विकसित करीत असून यातील फायझर ही अमेरिकन तर बायोटेक ही जर्मन औषध कंपनी आहे.

सोमवारी फायझर कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, या चाचणीत 90 टक्के रुग्णांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे समोर आले. या संक्रमित रुग्णांमध्ये कोरोनाचे किमान एक लक्षण होते. अद्याप चाचणीच्या टप्प्यात ही लस आहे. पण त्याचा वापर करण्याचा मार्ग लवकरच जगभरात मोकळा होईल. कोरोना साथीने आतापर्यंत जगभरात 1.2 दशलक्षाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे.

दरम्यान, यासंदर्भातील माहिती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. यात त्यांनी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस येणार असून ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.


याबाबत माहिती देताना बायोएनटेक कंपनीचे सह-संस्थापक उगुर साहिन यांनी सांगितले की, आमच्या आजचा दिवस खूप मोठा आहे. आजचा दिवस विज्ञान आणि मानवतेसाठी महान आहे. तसेच फायझर कंपनीचे अध्यक्ष अल्बर्ट बोरला यांनी म्हटले आहे की, कंपनीला कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात मोठे यश आले आहे. कंपनी या महिन्याच्या अखेरीस हेल्थ रेग्युलेटरकडे लस विक्रीच्या परवानगीसाठी अर्ज करणार आहे.