कोरोनामुक्त झालेले अजित पवार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले होते. सुरुवातील त्यांच्यात कणकण व इतर काही लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवून कोरोना चाचणी देखील करून घेतली होती. पण त्यांची पहिली चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तर, अजित पवारांना रुग्णालयातून 2 नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर आठवडाभर त्यांनी घरातच विश्रांती घेतली. कोरोनावर यशस्वी रित्या मात केल्यानंतर ते पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवारांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याची माहिती राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाटसअॅपद्वारे दिली होती.

आता, अजित पवार पुन्हा राज्याच्या सेवेत दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्ह करत अजित पवार पुन्हा जोमाने कामास लागल्याचे दाखवले. अजित पवार यात काही फाईलींवर सह्या करताना दिसले. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी आपल्या खुर्चीपासून बरंच अंतर ठेवल्याचे पाहायला मिळाले. या लाईव्हमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, दत्तात्रय भरणे गप्पा मारताना दिसत आहेत.