अर्णब गोस्वामींच्या सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी व्यक्त केली चिंता


मुंबई : आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात उडी घेतली आहे. राज्यपालांनी यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यपालांनी गृहमंत्र्यांना अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी सूचनाही केली आहे.

अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज्यपाल असे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. याआधी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे राज्य सरकार काहीसे अडचणीत आले होते. पण आता राज्यपालांनी अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात झालेल्या कारवाईवरुन थेट गृहमंत्र्यांनाच फोन केला आणि अर्णब यांची सुरक्षा तसेच आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. तसंच अर्णब यांना कुटुंबीयांशी बोलू आणि भेटू द्यावे अशी सूचनाही केली.

विशेष म्हणजे यापूर्वीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरुन राज्यपालांनी चिंता व्यक्त केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा देशमुखांना फोन करुन त्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.