एसटी कंडक्टरने आत्महत्येला ठाकरे सरकारला जबाबदार धरत घेतला गळफास


जळगाव – जळगाव जिल्ह्यात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर पगार थकल्यामुळे एका एस.टी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी (९ नोव्हेंबर) जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी चौधरी यांनी सुसाईट नोटही लिहून ठेवली आहे.

कोरोना संकटामुळे एसटी कर्चचाऱ्यांचे ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे वेतन रखडले आहे. सर्व एसटी कर्मचारी ऐन दिवाळीच्या तोंडावर चिंतेत आहेत. सध्या एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे जळगाव शहरात आणि एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आत्महत्येपूर्वी मनोज चौधरी यांनी एक सुसाईट नोट लिहून ठेवली असून त्यात त्यांनी एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार यास जबाबदार आहे. यात माझ्या घरच्यांचा काहीही संबंध नाही. माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा संघटनांनी माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे म्हटले आहे.

भाजपने या प्रकरणानंतर ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. गिरीश महाजन यांनी हे सरकार रामभरोसे सुरू असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, हे सरकार रामभरोसे असून त्यांना कोणत्याच संवेदना राहिलेल्या नाहीत काय असा सवाल निर्माण झाला आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने झाले पाहिजे. सरकारच्या संवेदना हरवल्या असून ते अपयशी ठरले आहे. तीन तिघाडा,काम बिघाडा सरकार नेमके कोण चालवत आहे ते समजायला मार्ग राहिला नाही.