‘बिग बास्केट’वर सायबर हल्ला; ३० लाख रुपयांना विकली दोन कोटी भारतीयांची खासगी माहिती


नवी दिल्ली – भारतातील चीनची गुंतवणूक असलेल्या ऑनलाइन किराणा माल विकणाऱ्या ‘बिग बास्केट’ या कंपनीवर सायबर हल्ला झाला असून जवळपास दोन कोटी ग्राहकांची खासगी माहिती चोरली गेली आहे. तसेच डार्कवेबवर ही माहिती ३० लाख रुपयांना विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील माहिती अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी इंटेलिजन्स फर्म ‘साबल इंक’ने दिली आहे.

सायबल इंकच्या ब्लॉग पोस्टनुसार, चोरीला जी माहिती गेली आहे त्यात ग्राहकांची नावे, ई-मेल आयडी, पासवर्ड, पिन, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, आयपी अॅड्रेस आणि ठिकाणं आदी संपूर्ण माहितीचा समावेश आहे. यासंदर्भात बंगळुरूस्थित असलेल्या बिग बास्केट कंपनीने शहरातील सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, कंपनी सध्या माहिती चोरल्याच्या दाव्याची पडताळणी आणि विश्लेषणात व्यस्त आहे.


याबाबत माहिती देताना बिग बास्केटने म्हटले की, ग्राहकांची खासगी माहिती आणि गोपनियतेला आम्ही प्राधान्य देतो. आम्ही ग्राहकांचा फानान्शिअल डेटा स्टोअर करत नाही, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड्सचे नंबर वैगरेंचा समावेश असतो. आम्ही खात्री देतो की ग्राहकांची फानान्शिअल माहिती सुरक्षित आहे. सायबल इंक ब्लॉगच्या पोस्टनुसार, १४ ऑक्टोबर २०२० रोजी बिग बास्केटच्या ग्राहकांच्या माहितीची चोरी झाल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाला याबाबत १ नोव्हेंबर रोजी माहिती देण्यात आली होती.