‘आई माझी काळुबाई’ मालिकेचा वाद आता उदयनराजेंच्या कोर्टात


सातारा – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी मालिका ‘आई माझी काळुबाई’ सध्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने केलेल्या आरोपावरून वादात सापडली आहे. सध्या हा वाद मराठी सिने व नाट्य क्षेत्रात चर्चेत असून, गावकऱ्यांनी मालिकेच्या चित्रीकरणालाही विरोध केला आहे. अभिनेत्री अलका कुबल यांनी या प्रकरणी छत्रपती उदयनराजे भोसले यांची रविवारी भेट घेतली.

सध्या ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यात सुरु असून निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत आला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने मालिका अर्ध्यावरच सोडल्याचे समोर आल्यानंतर अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.

अभिनेत्री अलका कुबल यांनी रविवारी या संपूर्ण प्रकरणात छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी अलका कुबल यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर प्राजक्ता गायकडवाड हिच्याशीही फोनवरून चर्चा करत वाद मिटवण्याची सूचना केली. उदयनराजे यांनी या भेटीची माहिती ट्विट करून दिली.


जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आज (रविवारी) भेट घेतली. काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी चर्चा केली हा वाद लवकरच मिटवून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली, असे उदयनराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.