एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा


मुंबईः परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दोन महिन्यांचा पगारही एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असून तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देणार असल्याची मोठी घोषणा अनिल परब यांनी केली आहे. या महिन्याचा पगार तासाभरात जमा होणार असल्याचीही माहितीही अनिल परबांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे संकटात असताना पैशांची राज्य सरकारकडे आवक कमी आहे. आपले उत्पन्न प्रवासी नसल्यामुळे बंद झाले आहे. त्यामुळे आपल्या वेतनाचा भार राज्य सरकार उचलेल यासाठी आपले पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. काळ थोडा कठीण आहे. पण त्यामुळे हताश होऊन टोकाचे पाऊल उचलू नका. हे तात्पुरते संकट आहे. त्यातून आपण मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांचे आयुष्य पूर्ववत करण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.

कोणतेही टोकाचे पाऊल उचलल्यामुळे आपल्या कुटुंबावर त्याचा परिणाम होऊन कुटुंब रस्त्यावर येते. त्यामुळे असे काहीही करू नका, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. आर्थिक संकटातून जळगावमधील एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर अनिल परब यांनी दुपारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे वेतन देण्याची घोषणा केली आहे.