पहेलवान बजरंग पुनियाचा स्वप्नभंग

फोटो साभार अमर उजाला

भारताचा नामवंत पहिलवान आणि अनेक पारितोषिकांचा मानकरी बजरंग पुनिया याचे स्वप्न करोनामुळे भंग पावणार आहे. बजरंग पेहेलवान संगीता फोगाट हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. आपला विवाह बँडबाजा, बारातीसह धामधुमीत साजरा करण्याचे त्याचे स्वप्न होते पण करोनामुळे केवळ २० नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह २५ नोव्हेंबरला संगीताच्या गावी बलाली येथे साजरा केला जात आहे. बजरंगचे वडील बलवानसिंह यांनाही मुलाचा विवाह धुमधडाक्यात साजरा करायचा होता, गावजेवण द्यायचे होते पण करोनाने त्यावर पाणी फिरविले आहे.

बलवानसिंग म्हणाले, या दोघांच्या विवाह गतवर्षी निश्चित झाला पण ऑलिम्पिक पार पडल्यावर तो करायचा असे ठरविले गेले होते. करोना मुळे ऑलिम्पिक पुढच्या वर्षावर गेले आहे. त्यामुळे हा विवाह २५ नोव्हेंबरला उरकण्याचा निर्णय घेतला गेला. आता साखरपुडा सुद्धा संगीताच्या घरी आदल्या दिवशी केला जाणार आहे आणि दुसरे दिवशी फक्त २० लोकांच्या उपस्थितीत विवाह होणार आहे. करोना संपेल तेव्हा विवाहाची मोठी मेजवानी दिली जाईल असे त्यांनी सांगितले.