वडेट्टीवारांची घोषणा; दिवाळीपूर्वी थेट खात्यात जमा होईल अतिवृष्टीची भरपाई


मुंबई – राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना ऑक्टोबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या व घरांच्या नुकसानीची भरपाई येत्या सोमवारपासून दिली जाईल, अशी माहिती दिली. राज्याने अतिवृष्टीच्या भरपाईसाठी एकूण १० हजार कोटींची तरतूद केली असून शेती व शेतघरे, पशुधन, मृतांचे वारस यांच्यासाठी त्यापैकी ५ हजार ५०० कोटी वापरण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात सणासुदीला पाणी राहू नये म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांच्या निवडणुकीमुळे सध्या राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. पण आचारसंहितेची आपत्तीच्या मदत वाटपाला अडचण नसते. आपद्ग्रस्तांना यापूर्वी मदतीचे वाटप आचारसंहितेच्या काळात झालेले आहे. निवडणूक आयोगाकडून त्यासंदर्भातील परवानगी घेतली जाईल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

तब्बल ३८ हजार कोटी रुपये राज्याचे केंद्राकडून येणे बाकी आहे. केंद्र सरकारला आम्ही अतिवृष्टीच्या भरपाईचे पैसे देण्यासंदर्भात तीन पत्रे पाठवली आहेत. पण केंद्राने अद्याप पैसे देण्यासंदर्भात काहीच कळवलेले नाही. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अतिवृष्टीतील सर्व आपदग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवू, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

१० हजार रुपये जिरायत, बागायतच्या नुकसान भरपाईसाठी प्रति हेक्टरी (२ हेक्टरच्या मर्यादेत)तर २५ हजार रुपये फळ पिकांच्या भरपाईसाठी प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) तसेच पशुधन, शेतघरे व मृतांच्या वारसांना भरीव मदत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून यापूर्वीच त्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली होती.