एकेकाळी ज्यांचा अशिक्षित, पागल असा उल्लेख केला, आता त्यांनीच केला गोस्वामींच्या अटकेला केला विरोध


नवी दिल्ली – बिहारच्या एका सभेला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अर्णब गोस्वामी हे देशातील एक मोठे पत्रकार असल्याचे म्हटले आहे. पण यापूर्वी एका टीव्ही शोमध्ये अर्णब गोस्वामी यांनी योगी आदित्यनाथ यांचा अशिक्षित आणि पागल असा उल्लेख केला होता. समाजवादी पक्षाचे प्रवक्ता पवन पांडे यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत, ‘क्या से क्या हो गया देखते-देखते,’ असे कॅप्शन दिले आहे. आता सोशल मिडियावर पवन पांडे यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाषणाचा काही भाग या व्हिडिओमध्ये आहे. ते काँग्रेसवर यात लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत आहेत. योगी आदित्यनाथांनी यात म्हटले आहे, काँग्रेसने 1975मध्ये आणीबाणी लादली होती आणि आजच आपण पाहिले असेल, की आपल्या स्वार्थासाठी देशातील एका फार मोठ्या पत्रकाराला अटक करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करण्याचे काम काँग्रेसने केले आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या त्या टीव्ही शोचाही काही भाग या व्हिडीओच्या शेवटी दाखवण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यात म्हणात आहेत, योगी आदित्यनाथ तर असे व्यक्ती आहेत, त्यांना धर्माच्या बाबतीत काही माहीतच नाही. ते असे अशिक्षित व्यक्ती आहेत, की कुणी त्यांना सांगायला हवे, तुम्ही तुमचे मानसिक संतुलन तपासून घ्या.