कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दिवाळीसाठी गाईडलाईन्स जारी


मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सण साजरा करण्यासाठी सविस्तर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी साजरा केला जावा, आवाजाचा उत्सव म्हणून नाही, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील फटाकेबंदीवरुन जोरदार चर्चा झाली.

राज्य सरकारने जारी केलेल्या दिवाळीच्या मार्गदर्शक सूचना

  • कोरोना संदर्भात असलेल्या SOP चे पालन करावे
  • दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
  • दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.
  • धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नसल्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.

दरम्यान मुंबई महानगरपालिकेने यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहे. मरिन ड्राईव्ह, जुहू बीच, वरळी सीफेस सारख्या सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडता येणार नाहीत. सोसायटी आणि घराच्या आवारातच फटाके फोडण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. सदर नियमावलीचे उल्लंघन केल्यास पोलिसांच्या मदतीने मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्याय येणार आहे.