भारतातून येणाऱ्या परदेशी नागरिकांना चीनची प्रवेशबंदी


बीजिंग – भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना चीनने आपल्या देशात प्रवेशबंदी केली आहे. हा निर्णय चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना लागू असणार आहे. यांसदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, तात्पुरत्या स्वरुपासाठी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही चीनने स्थगिती आणली आहे.

यासंदर्भातील अधिकृत निवेदन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. चीनमध्ये आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. ३ नोव्हेंबरनंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.

हा निर्णय कोरोना संकटामुळे घेण्यात आला असून तात्पुरत्या स्वरुपाचा असेल असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुढील निर्णय कोरोनासंबंधी परिस्थितीप्रमाणे घेतले जातील असे चीनने आपल्या निवेदनात सांगितले आहे. फक्त भारतापुरता मर्यादित हा निर्णय नसून याआधी इतर देशांसंबंधीही असा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजना म्हणून चीन अशा प्रकारची पावले उचलत आहे. चीनमध्ये भारताशिवाय ब्रिटेन, बेल्जिअम आणि फिलिपाइन्समधून नागरिकांनाही प्रवेशबंदी आहे. त्याचबरोबर फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतील नागरिकांना प्रवेश करण्याआधी वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करण्याचा आदेश आहे.