अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी फडणवीस सरकारमधील मंत्र्यावर अनिल देशमुखांचा आरोप


मुंबई: ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांचा प्रसिद्ध वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात जबाब रायगड ऐवजी मुंबईत नोंदवण्यात आला होता. फडणवीस सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याने त्यामध्ये हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

रायगड पोलिसांनी बुधवारी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांच्या मुंबईतील घरातून ताब्यात घेतले आहे. अर्णब यांच्यावर नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आत्महत्येपूर्वी नाईक यांनी स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीत तसे नमूद केले असल्यामुळे अर्णब अडचणीत आले आहेत. अर्णब यांच्यावर आतापर्यंत कारवाई राजकीय संरक्षण असल्यामुळेच होऊ शकली नाही, असे कारण आता पुढे येत आहे.

२०१८ साली अन्वय यांनी आत्महत्या केली होती. तेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते. या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांचे नाव पुढे आल्यानंतर नियमानुसार, जिथे घटना घडली व गुन्हा दाखल झाला तिथे त्यांचा जबाब नोंदवणे गरजेचे होते. पण यात एका नेत्याने हस्तक्षेप करत तपास अधिकारी अनिल पारसकर यांना मुंबई पोलीस आयुक्तालयातील सह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात अर्णब यांचा जबाब नोंदवण्यास भाग पाडले. २६ मे २०१८ रोजी तशा सूचना पारसकर यांना दिल्यानंतर ३० मे रोजी गोस्वामी यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचे देशमुख म्हणाले.