प्राणी देतात भूकंपांचे संकेत

dogs
जगभरात नेपाळ, जपानला बसलेल्या भूकंपांची चर्चा जोरात सुरू असताना भूकंपाचे भाकित अगोदर वर्तविता येत नाही असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. मात्र शतकांपासून भूकंपांचे आडाखे प्राण्यांच्या वर्तणुकीतून बांधले जात आहेत आणि ते बरेचवेळा अचूकही असतात असे दिसून आले आहे. प्राणी भूकंपाचे संकेत देऊ शकतात हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येत नसले तरी या विषयांत जगभरात सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जात आहे.

इटली, जपान, चीनसह अनेक देशात हे संशोधन सुरू आहे. पाण्यात राहणार्‍या प्राण्यांना भूकंपाची चाहूल अधिक प्रमाणात लागते असे सांगितले जाते. बेडूक, मासे भूकंपाचे संकेत देऊ शकतात. इटालीत २००९ साली झालेल्या भूकंपाच्या वेळी भूकंप होण्याअगोदरच तलावातील बेडूक बाहेर पडले होते आणि दुसरीकडे त्यांनी आश्रय घेतला होता. तर नेहमी खोल पाण्यात राहणारे ओरफिश मासे भूकंपाच्या अगोदर किनार्‍यावर आलेले दिसले होते. १८ ते २० फूट लांबीचा हा मासा किनार्‍यावर कधीच दिसत नाही. मात्र जपानला २०११ साली बसलेल्या भूकंप आणि त्सुनामीच्या फटक्याच्यावेळी हे मासे पाण्याबाहेर आलेले दिसले. जपानी लोकांनी त्यांना मेसेजर फ्रॉम सी गॉड असे संबोधन दिले आहे.

चिलीत २०१० साली झालेल्या भूकंपाच्या वेळीही ओरफिश मासे किनार्‍यावर दिसले होते.या बाबत संशोधकांचे असे म्हणणे आहे की भूस्तरातील हालचालींमुळे खडकातून चार्ज झालेले कण पाण्यात मिसळत अ्रसावेत व त्यामुळे पाण्यात झालेला बदल या प्राण्यांना समजत असावा. युरोपियन भूगर्भ तज्ञांनी सतत तीन वर्षे लाल मुंग्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला तेव्हा त्यांनाही भूकंप होणार असेल तर या मुंग्यांची वागणूक बदलते व त्या रात्रीही वारूळाबाहेर येतात असे निरीक्षण नोंदविले आहे.

घरच्या घरी भूकंपाचा संकेत पाळीव प्राणी देतात. घरातली मांजरे, कुत्री अचानक घाबरी झाली, अस्वस्थ वाटली तर तो भूकंपाचा संकेत असू शकतो असे समजले जाते. या प्राण्यांना माणसांना ज्या लहरी जाणवत नाहीत त्या जाणवतात व त्यामुळे त्यांच्या वर्तणुकीत बदल होतात असे सांगितले जाते.

Leave a Comment