यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी होण्याची शक्यता; आरोग्यमंत्र्यांचे संकेत


मुंबई: आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यंदाच्या दिवाळीत राज्यात फटाक्यांवर बंदी घातली जाण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम कोरोना रुग्णांवर होऊ शकतो. त्यामुळे फटाकेमुक्त दिवाळीसाठी आरोग्य विभाग आग्रही आहे. फटाक्यांमुळे प्रदूषण वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. श्वसनाशीच संबंधित कोरोनाचा आजार असल्यामुळे राज्यात यंदा फटाके विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते.

आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. त्याचा त्रास कोरोनाबाधितांना होऊ शकतो. त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. राज्याचा आरोग्य विभागही फटाकेमुक्त दिवाळीसाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळेच याबद्दलचा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मांडला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास यंदा राज्यात फटाके विक्रीवर बंदी असेल.

फटाकेमुक्त दिवाळीसंदर्भात कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्ससोबत चर्चा सुरू आहे. फटाकेमुक्त यंदाची दिवाळी असावी, यासाठी राजेश टोपे प्रयत्नशील आहेत. त्यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले आहेत. दिवाळीचा सण जवळ आला आहे. पण कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त कशी करता येईल, याचा विचार आपण करायला हवा. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाकडे यासाठी आग्रह धरणार असल्याचे टोपे म्हणाले.