अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; हक्कभंग प्रकरणी विशेषाधिकार समितीची बैठक


मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या विरोधातील विधानसभेतील हक्कभंग प्रकरणी कामकाज सुरू झाले आहे. आज अर्णब यांच्या विरोधातील हक्कभंग प्रकरणी विशेषाधिकार समितीची बैठक बोलावली आहे.

बैठकीचे निमंत्रण अर्णबविरोधात हक्कभंग मांडणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना देण्यात आले आहे. सरनाईक यांना विशेषाधिकार समितीने अर्णबविरोधातील हक्कभंग प्रकरणी प्राथमिक चर्चा करण्यासाठी बैठकीला बोलवले आहे. प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अवमानप्रकरणी अर्णबविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गोस्वामी यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने पोलीस कोठडीची गरज नसल्याचे म्हटले. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर अर्णब यांचे वकील आबड पोंडा आणि गौरव पारकर यांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. या संदर्भात न्यायालयाने पोलिसांना उत्तर देण्यास सांगितले आहे. आज किंवा उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. न्यायालयात काल रात्री तब्बल सहा तास सुनावणी झाली.