अर्णब गोस्वामींच्या अटकेवर काय म्हणाले संजय राऊत


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी संबंध असण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले आहेत. कधीच कोणावर मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नसल्याचे सांगत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले आहे.

महाराष्ट्रातील काम कायद्याने चालते. आमच्याकडून जर काही चुकले असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणावर अन्याय करत नाहीत किंवा सूडाने कारवाई करत नसल्मुळे जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल. सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा त्याच्याशी संबंध असण्याचे कारण नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

आम्हा सर्वांविरोधात बदनामीची मोहीम रिपब्लिकने चालवली होती. आमच्यावर खोटे आरोप केले होते. खोटे आरोप होत असतील तर त्याचाही तपास झाला पाहिजे असे आम्ही म्हटले होते. आता कोण काय म्हणाले याचं स्पष्टीकरण मी देण्यासाठी आलो नसल्याचे यावेळी ते म्हणाले.

पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचे मला वाटत नाही. आपल्या मर्यादा पत्रकारांनीही पाळल्या पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असताना मर्यादा पाळल्या पाहिजेत. सर्वोच्च न्यायालयाने त्या चॅनेलसंबंधी काय सांगितले आहे ते समजून घ्या. तुम्ही न्यायालय किंवा तपास यंत्रणा नाही. कोणाविरोधातही तुम्ही काहीही सांगून लोकांची दिशाभूल करु शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले असताना त्यांनाही हा काळा दिवस आहे विचारणार का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

चुकीचं काम केलं नसेल तर मग तो पत्रकार, राजकीय नेता, अभिनेता कोणीही असो ओरडण्याचे कारण नाही. प्रसारमाध्यमांना या देशात सर्वात जास्त स्वातंत्र्य आहे. एवढे स्वातंत्र्य इतर कोणत्याही देशात नाही. उत्तर प्रदेशात पत्रकारांवर कठोर कारवाई केली जाते त्याबद्दल कोणी बोलत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.