फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून राज्य सरकार पोलिसांची बदनामी केल्याचे चौकशीतून उघड


मुंबई : महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरच्या माध्यमातून बदनामी करण्याची मोहिम सुरु करण्यात आली होती. सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्यामार्फत या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली होती, नुकताच त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार, ही बदनामीची मोहिम चीन, हाँगकाँग, नेपाळ या देशातून BOTs माध्यमातून चालवण्यात आली होती.

जून ते ऑक्टोबर या काळात महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना बदनाम करण्यासाठी दीड लाखांपेक्षा फेक अकाउंट सोशल मीडियावर सुरू करण्यात आली होती. बदनामीची मोहीम एक हजारहून जास्त BOTs च्या माध्यमातून राबवली गेली. मुंबई पोलिसांना सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट यांचा अहवाल देण्यात आला आहे.

सायबर पोलिसांची चौकशी गेले महिनाभर सुरू होती. जी फेक अकाउंट्स होती, ती जास्तीत जास्त BOTs च्या माध्यमातून भारताबाहेरुन चालवली जात होती. ही अकाउंट्स चीन, नेपाळ, हाँगकाँग अशा देशातून BOTs माध्यमातून चालवण्यात येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातून देखील जी अकाऊंट्स चालवण्यात आली ती देखील आपली ओळख लपवण्यासाठी प्रॉक्सी सर्व्हरच्या माध्यमातून चालवण्यात आली. तसेच यातील अनेक अकाउंट्स आता डिलिट करण्यात येत आहेत किंवा केलेले ट्विट्स, माहिती आता डिलीट करण्यात येत आहे.

अभिनेत्री रविना टंडनचे देखील या फेक अकाऊंट्समध्ये एक अकाउंट तयार करण्यात आले होते. त्या फेक अकाऊंटद्वारेही राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सायबर पोलिसांची मागील महिन्याभरापासून चौकशी सुरू होती, तेव्हा त्यांना सायबर एक्सपर्ट्सचा अहवाल प्राप्त झाला आहे.