काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कटाचा भांडाफोड केल्याची अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत आहे शिक्षा


मुंबई – आज रायगड पोलिसांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरुद्ध विरोधक असा वाद उभा राहत असल्याचे चित्र दिसत आहे. पोलिसांनी अन्वय नाईक प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर राज्य सरकारला विरोध बाकांवरील भाजपने लक्ष्य केलं आहे. या प्रकरणावरून थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल राहुल गांधी यांच्याकडेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर मागितले आहे.


ही कारवाई वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी करण्यात आली आहे. अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता. रायगड पोलिसांनी आज या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक केली.

देवेंद्र फडणवीस यांनी या अटकेवरून ट्विट करत काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे. अर्णब गोस्वामी यांना जातीय हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कटाचा भांडाफोड केल्याची शिक्षा भोगावी लागत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे देश टुकडे टुकडे गँग असो की, पालघरमधील खूनी, यांना शरण देणारे कोण आहेत? याचे उत्तर मागत आहे. त्याच काँग्रेसच्या इशाऱ्यांवर नाचणारे कुमकुवत सरकार महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने घेऊन जात आहे. आता कुठे लपून बसले आहेत माध्यमांच्या अभिव्यक्तीविषयी बोलणारे? आज सगळे दुतोंडी चेहरे उघडे पडले असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.