रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना अटक

फोटो साभार झी न्यूज

टीआरपी घोटाळ्यामुळे चर्चेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णव गोस्वामी याना २०१८ मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे राहत्या घरातून सकाळी आठच्या सुमारास अटक करण्यात आल्याचे समजते. त्यांना मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले असून तेथून त्यांना अलिबाग येथे नेऊन कोर्टासमोर उभे केले जाणार आहे. दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार अर्णव यांनी केली असून या अटक सत्राचे लाईव फुटेज रिपब्लिक टीव्हीने केले.

मिळालेल्या माहितीनुसार अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्ही स्टुडीओची अंतर्गत सजावट इंटिरीअर डिझायनर अन्वय नाईक यांनी केली होती. अन्वय यांना व्यवसायात नुकसान झाले होते त्यामुळे ५३ वर्षीय अन्वय यांनी त्यांच्या आईसह अलिबाग येथील घरात आत्महत्या केली होती. त्यावेळी लिहिलेल्या चिठीमध्ये त्यांनी अर्णव व अन्य तिघानी त्यांचे पैसे थकविल्याकारणाने आत्महत्या करण्याची पाळी आल्याचे म्हटले होते. अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

दरम्यान अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी ५ मे २०२० रोजी म्हणजे आत्महत्येला दोन वर्षे उलटल्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्यांना न्याय मिळावा अशी विनंती केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यानंतर सीआयडी विभागाला या प्रकारणाच्या तपासाचे अधिकार दिले होते असे सांगितले जात आहे.

दरम्यान अर्णव गोस्वामी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अन्वय नाईक यांच्या कामाचे सर्व पैसे त्यांनी दिलेले असून त्याच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत. अटक करायला गेलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने औषधाच्या गोळ्याही घेऊ दिल्या नाहीत असा आरोप अर्णव यांनी केला आहे.