ठाकरे पिता-पुत्राविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २४ ऑक्टोबरला समीत ठक्करला अटक करण्यात आली होती. आज त्याला न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

समित ठक्करने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना औरंगजेब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पेंग्विनशी तुलना करणारे ट्विट केले होते. मुंबईत दोन आणि नागपुरात याप्रकरणी शिवसैनिकांच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल करण्यात आला. २० ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. समीत ठक्करवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा आरोप आहे. त्याला २० ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर त्याला २४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.