आशिष शेलारांचा टोला : ठाकरे सरकारचा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा कारभार


मुंबईः केंद्र आणि राज्य सरकार मेट्रोच्या कारशेडवरून आमनेसामने आले असून, मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकारने केल्यानंतर आता ठाकरे सरकारवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारचा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा कारभार असल्याचा घणाघात भाजप आमदार आशिष शेलारांनी केला आहे.

आरेच्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. आम्ही त्याच वेळेला म्हटले होते, राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसत आहे. आम्ही घोषणा झाली तेव्हाच प्रतिक्रिया देताना स्पष्ट म्हटले होते. मुंबईकरांना अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे त्रास होत आहे. ज्या पद्धतीच्या गोष्टी आज समोर येत आहेत. आम्ही त्यावेळेला सुद्धा सांगताना म्हटले होते. मीठागर आयुक्त सॉल्ट कमिश्नरची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का?, असा सवालही आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे.

केंद्राच्या पत्राने आज एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. मुंबईकरांना अहंकारी प्रवृत्तीने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची मेट्रोच्या विकासामध्ये कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. पहिल्यांदा लटकवणे, अडकवणे, जागा ट्रान्सफर करताना ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होती, ती केलेली दिसत नाही. मीठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही.

अडकवणे, भटकवणे आणि चुकीची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे, असा निर्णय यांनी घेतला आहे. माननीय उद्धव ठाकरेजींनी मेट्रोच्या प्रकल्पात घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे अशा पद्धतीचा आहे. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपवली आहे. राज्य सरकार यामध्ये सर्वस्वी दोषी असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

केंद्राने मिठागराची जागा म्हटले असेल पण अशा अनेक जागा आहेत. त्या आपण दिलेल्या आहेत. ज्या कामासाठी आम्ही ती जागा मागत आहोत, ते काम लोकांचेच आहे. मिठागराच्या अशा अनेक जागा आहे. त्या डावलण्यात आल्या आहेत. आपण बाजूला कुठे तरी मिठागर करू शकतो, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर म्हणाल्या आहेत. केंद्राची ती जागा असेल, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत. पण आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना, अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचे षडयंत्र हे रचले जात असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.