बिहारमधील नागरिक मुंबई-दिल्लीला रोजगारासाठी नव्हे तर हौस-मौज करण्यासाठी जातात


नवी दिल्ली – आज बिहार विधानसभेच्या निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान सत्ताधारी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाच्या एका आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बिहारच्या जनतेबद्दल दरभंगामधील कुशेश्वरस्थानचे जेडीयूचे आमदार आणि सध्या उमेदवार असलेले शशि भूषण हजारी यांनी एक वक्तव्य केले असून सध्या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बिहारमधील नागरिक हे मुंबई-दिल्लीला रोजगारासाठी नाही तर हौस-मौज करण्यासाठी जात असल्याचे शशि भूषण हजारी यांनी म्हटले आहे.

(व्हिडीओ सौजन्य-News18 Hindi)
दरवर्षी माझ्या मतदारसंघामध्ये पुराची समस्या असते. पण कामाच्या शोधात येथील लोक इतर राज्यामध्ये जात नसल्याचा दावा हजारी यांनी केला आहे. पण बिहारमधील काही ठिकाणचे नागरिक हे फक्त हौस म्हणून राज्याबाहेर जातात असे, हजारी यांनी व्हिडीओमध्ये म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावरून निशाणा साधला आहे. दुसऱ्या राज्यांमध्ये रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या बिहारी मजुरांऐवढेच पैसे गावातील मजुरांना मिळतात, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

माझ्या मतदारसंघात कामाची कोणतीही कमतरता नसल्याचे देखील शशि भूषण हजारी यांनी म्हटले आहे. तसेच ज्यांना काम मिळत नाही त्यांना मनरेगाचे काम दिले जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. बिहारमधील लोक हे हौशी असतात. त्यामुळे दोन ते चार महिने येथे पुराचा त्रास असतो, तेव्हा मुंबई-दिल्ली फिरुन होईल आणि रोजगारही मिळेल असा विचार करुन ते जातात. पुराच्या काळात काहीजण तर केवळ फिरण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जातात. पण पूर ओसरल्यावर शेतीच्या कामांसाठी पुन्हा बिहारमध्ये येतात, असे देखील हजारी यांनी म्हटले आहे.