पाकिस्तानाच्या लाहोर मतदारसंघात झळकले मोदी, अभिनंदनचे पोस्टर


लाहोर – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत अयाज सादिक यांचे छायाचित्र असलेले भव्य पोस्टर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे खासदार सरदार अयाज सादिक यांचा मतदारसंघ असलेल्या लोहोरमध्ये ठिकठिकाणी झळकली. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत.

पाकिस्तानच्या संसदेत पीएमएल-एनचे खासदार अयाज सादिक यांनी असे सांगितले होते की, जर पाकिस्तानने भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली नसती, तर भारताकडून त्या दिवशी रात्री हल्ला होईल या भीतीपोटी पाकिस्तानने त्यांची सुटका केली. त्याचबरोबर यासाठी आयोजित बैठकीत लष्करप्रमुख जनरल कमर जावेद यांना चांगलाच घाम फुटला होता आणि त्याचे पाय थरथरत होते. त्यानंतर लगेचच हे पोस्टर झळकले.

अयाज सादिक यांच्यावर या पोस्टरच्या माध्यमातून निशाणा साधण्यात आला असून अनेक पोस्टरमध्ये त्यांचा देशद्रोही असा उल्लेख करण्यात आला आहे. लाहोरच्या रस्त्यांवर झळकलेल्या पोस्टरमध्ये अयाज सादिक यांना विश्वासघातकी संबोधत त्यांची तुलना मीर जाफर यांच्याशी करण्यात आली आहे. काही फलकांमध्ये सादिक यांना अभिनंदन वर्धमानच्या रूपात दाखविण्यात आले असून अनेक फलकांत त्यांना भारताचे समर्थक म्हटले आहे.