राजस्थान सरकारचा मोठा निर्णय : फटाक्यांची विक्री व आतिशबाजीवर बंदी


जयपूर – फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारने घेतला आहे. फटाक्यांच्या विषारी धुरापासून कोरोना संक्रमितांच्या संरक्षणासाठी संपूर्ण राज्यात फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतिशबाजीवर मुख्यमंत्री गेहलोत यांनी बंदी घातली आहे. त्याचबरोबर प्रदुषण करणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश गेहलोत सरकारने दिले आहेत.

याबाबत मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, राज्यातील नागरिकांच्या जीवाचे कोरोना महामारीच्या या आव्हानात्मक काळात संरक्षण करणे सर्वात महत्वाचे आहे. आतिशबाजीतून निर्माण होणाऱ्या धुरामुळे कोरोनाबाधितांबरोबरच हृदय आणि श्वसनाची समस्या असणाऱ्या रुग्णांनाही त्रास सहन करावा लागतो, यामुळे, लोकांनी दिवाळीत फटाके वाजवू नये. त्याचबरोबर त्यांनी फटाके विक्रीच्या अस्थायी परवान्यांनाही स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच लग्न आणि इतर समारंभांतही आतिशबाजी करू नये, असेही गेहलोत म्हणाले.

रविवारी सायंकाळी गेहलोत यांनी आपल्या निवास स्थानी राज्यातील कोरोना स्थितीचा आणि ‘नो मास्क-नो एंट्री’ आणि ‘शुद्धतेसाठी युद्ध’ अभियानाचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी अनलॉक-6 च्या मार्गदर्शक तत्वांवरही चर्चा केली. तसेच काही दिशा-निर्देशही दिले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेनसारख्या विकसित देशांत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. अनेक देशांना तर पुन्हा लॉकडाउनची घोषणा करावी लागली आहे. आपल्याकडेही अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आपणही सावधगिरी बाळगायला हवी.