हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट; राज्यपाल फेटाळणार ठाकरे सरकारकडून जाणाऱ्या १२ जणांच्या नावाची यादी


कोल्हापूर : राज्यातील राजकीय वर्तुळात सध्याच्या घडीला विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या १२ जागांच्या शिफारशी फेटाळतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनय कोरे यांना खासगीत सांगितल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरात आज पत्रकार परिषदेत बोलताना केला.

विधानपरिषदेवर महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांची नियुक्ती करणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यासाठी शिफारशी पाठविण्यात येत आहेत. पण भाजप नियुक्त राज्यपालांकडून या शिफारशी फेटाळण्यात येतील, अशी व्यवस्था केल्याची माहिती विनय कोरे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

राज्यपाल कला, साहित्य, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. राज्याला त्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

राज्यपालांना महाराष्ट्र विधान परिषदेत १२ सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून सहसा स्वीकारली जातात. पण सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जात आहे.