ज्याने प्रसिद्धी मिळवून दिली त्याच्या विरोधात बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांची तक्रार


नवी दिल्ली : बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे कांता प्रसाद देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दरम्यान हा ढाबा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर आणि यूट्यूबर गौरव वासनविरोधात ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी पैशांचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल केली आहे. गौरव याने कांता प्रसाद यांना पैसे देण्याचे आवाहन केले होते. ही पोस्ट खूप व्हायरल झाली. पण कांता प्रसाद यांचा अकाऊंट नंबर न देता गौरवने स्वत:चा अकाऊंट नंबर दिला होता. यामध्ये घोटाळा झाल्याचा संशय आहे.

गौरव वासनने बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा व्हिडीओ बनवला होता. जो सोशल मीडियात खूप व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाबा का ढाबा येथे लोकांनी गर्दी केली आणि कांता प्रसाद यांनी बनवलेलं जेवण काही मिनिटात संपू लागले.

आपला व्हिडीओ बनवून ऑनलाईन शेअर केला आणि सोशल मीडियात पैसे देण्याचे वासनने आवाहन केले. हे करताना त्याने जाणूनबुजून स्वत:चा आणि स्वत:च्या ओळखीच्यांचा अकाऊंट नंबर दिल्याची तक्रार कांता प्रसाद यांनी पोलिसांत केली. कांता प्रसाद यांना माहिती न देता मोठी रक्कम गोळा केली. कांता प्रसाद यांनी वारंवार पैशांबद्दल मागणी केली पण त्याने कोणतीही माहिती दिली नसल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. पण आतापर्यंत कोणतीही एफआयआर दाखल न झाल्याचे सांगण्यात येत आहे.