‘राज’ पिता-पुत्राचा टेनिस खेळतानाचा फोटो व्हायरल


मुंबई : सध्या सोशल मीडियात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा शिवाजी पार्क जिमखान्यातील एकत्र टेनिस खेळतानाचा फोटो चर्चेचा विषय बनला आहे. राज ठाकरे यांचा याआधी देखील टेनिस खेळतानाचा फोटो समोर आला होता. तो फोटो मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला होता. पण आता त्यांच्यासोबत अमित ठाकरे हे देखील दिसत आहेत. यामुळे राज ठाकरेंचे टेनिस प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे.

राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावर क्रिकेट देखील खेळायचे. पण एकदा पायाला जोरात बॉल लागल्यामुळे त्यांनी क्रिकेट खेळणे सोडले. याबाबतचा उल्लेख ज्येष्ठ राजकीय पत्रकार धवल कुलकर्णी यांच्या ‘ठाकरे कझिन्स’ पुस्तकात देखील आहे. बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंना बॉल लागल्यानंतर म्हणाले होते की, आज तुझ्या पायावर बॉल लागून पाय सुजला आहे. उद्या हातावर बॉल लागला आणि हात सुजला तर व्यंगचित्रकार होण्याच्या स्वप्नाचे काय? त्यानंतरच राज ठाकरे यांनी क्रिकेट खेळणे सोडल्याचे सांगितले जाते.

राज्याच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आणखी अॅक्टीव्ह झाले आहेत. त्यांच्या पक्षाने लॉकडाऊन नंतर अनेक मुद्द्यांवर आंदोलन केले. राज ठाकरे यांनी स्वत: देखील काही दिवसांपूर्वीच राज्यपालांची देखील भेट घेतली. महाराष्ट्रात राज ठाकरे यांना फॉलो करणारे हजारो कार्यकर्ते आहेत. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेल्यानंतर आता मनसे भाजप सोबत येणार का अशी देखील चर्चा महाराष्ट्रात सुरु आहे. सध्या तरी असे कोणतेही चित्र नसले तरी पुढे काहीही होऊ शकते. कारण राजकारणात कोणतीच गोष्ट अशक्य नसते.