संजय राऊत जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख; चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका


पुणे – भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. पुण्यातील बोपोडी येथील एका कार्यक्रमास चंद्रकांत पाटील हे एका कार्यक्रमास आले होते. त्यावेळी त्यांना संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख आहेत. या जगामध्ये एवढ्या वर्षानंतर संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले असून त्यांच्याकडे फक्त भारतातील नव्हे, तर महाराष्ट्रातील नाही. तर संपूर्ण जगातील विषयावर मत असल्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार अशा शब्दात आपली भूमिका मांडली.

महाराष्ट्रामध्ये बेळगाव येथील गावाचा समावेश करण्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कन्नड भाषिक तेथील अनेक गावात अधिक आहेत. ती गावे स्वाभाविकपणे कर्नाटकमध्ये गेली आहेत. त्यातील ८०० अशी गावे आहेत. जी महाराष्ट्रात आली पाहिजेत. भारतीय जनता पार्टीची ही भूमिका असल्याचे पाटील म्हणाले.

त्याचबरोबर संजय राऊत यांची भाजपवर टीका करणे, ही ड्युटी आहे आणि ते आपली योग्यपणे ड्युटी पार पडत आहेत. पण त्यांना इतरांनी टीका केलेली चालत नाही, ती त्यांना लगेच टोचते. तसेच मुख्यमंत्री शरद पवारांचा सल्ला घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केले आहे. म्हणजे शिवसेनेने पवार सरकार चालवतात हे मान्य केल्याचे पाटील म्हणाले.