इंटरव्ह्यूमध्ये टाळण्याच्या गोष्टी

interview
नोकरीसाठी इंटरव्ह्यू देताना काय करावे आणि काय करू नये याच्या अनेक लहान-मोठ्या सूचना देणार्‍या काही वेबसाईटस् आहेत. परंतु त्या वेबसाईटस्मध्ये इतक्या किरकोळ सूचना केलेल्या असतात की त्या वाचल्यानंतर आपल्याला हसावे की रडावे कळत नाही. आता इंटरव्ह्यूमध्ये हसावे अशी सूचना काही वेबसाईट देतात. त्या तयार करणारे हुशार लोक काय जगातल्या सर्वांना मूर्ख समजतात की काय असा प्रश्‍न पडतो. कारण इंटरव्ह्यूत हसावे म्हणजे काय उगीच हसावे की काय? खरे म्हणजे रडवेला चेहरा घेऊन जाऊ नये हे खरे आहे, पण ते कोणालाही कळू शकते. इंटरव्ह्यूच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूत उत्तीर्ण होऊन ती विशिष्ट नोकरी मिळणे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्या सगळ्या गोष्टी अमूर्त असतात. त्यामुळे एखाद्या इंटरव्ह्यूत आपल्याला यश आले नाही तर आपण स्वत:ला अपात्र समजू नये.

इंटरव्ह्यूत उत्तीर्ण झालो नाही म्हणजे यापुढे मी आता कोणत्या कामाचाच राहिलो नाही असे तर अजिबात मानू नये. मात्र आपण ज्या इंटरव्ह्यूमध्ये अपात्र ठरलेले असतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत का याचा जरूर विचार केला पाहिजे. त्या चुका दुरुस्त करून पुढच्या इंटरव्ह्यूला गेले पाहिजे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की, इंटरव्ह्यूत उत्तीर्ण होण्याचा कसलाही नेमका ङ्गॉर्म्युला नाही. त्यामुळे त्याची विशिष्ट पद्धतीने तयारी केली जात नाही. अनेक स्पर्धात्मक परीक्षांचे कोचिंग क्लास असतात आणि त्यांच्यासाठी कोचिंग दिले जाते. तसे इंटरव्ह्यूच्या बाबतीत होत नाही. त्याचे कोठेही कोचिंग नसते. मात्र कोणत्याही प्रकारच्या इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी होण्याची तयारी सातत्याने जारी असते.

रात्रंदिवस आपण जे जे पाहतो, वाचतो, ऐकतो आणि अनुभवतो त्या सगळ्यातून आपल्या इंटरव्ह्यूची पूर्वतयारी होत असते. लेखी परीक्षेच्या आदल्या रात्री बरेच टेन्शन येते. परंतु इंटरव्ह्यूचे तसे नसते. इंटरव्ह्यू ही एक इंटरऍक्शन असते. तुमची मानसिक तयारी तपासण्याचे ते एक साधन असते. त्यामुळे त्याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. असे असले तरी कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू घेणारे पॅनल शेवटी एखादा खोचक प्रश्‍न विचारत असते. त्या प्रश्‍नावरून आपण विचलित होऊ शकतो, परंतु त्या प्रश्‍नावरची आपली प्रतिक्रिया ही इंटरव्ह्यूमध्ये निर्णायक नसते हे लक्षात ठेवले पाहिजे.

Leave a Comment