व्हायरल : महिला घराबाहेर पडल्यामुळेच समस्या निर्माण होतात; मुकेश खन्नांचे वादग्रस्त वक्तव्य


सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे अभिनेते मुकेश खन्ना हे चर्चेत असतात. त्यांनी कपिल शर्मा शोवर काही दिवसांपूर्वी टीका करत शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिल्यानंतर अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या शिर्षकावर त्यांनी आक्षेप घेतला होता. आता सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते मीटू चळवळीवर या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.


मुकेश खन्ना यांचा जुना व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. महिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात असे या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले आहे. महिलांचे काम आहे घर सांभाळणे. मला माफ करा मी कधीकधी बोलून जातो. मीटू ही समस्या कधी पासून सुरु झाली, जेव्हा महिलांनी देखील काम करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या गोष्टी करतात. पण मी सांगू इच्छितो की समस्या येथूनच सुरु होतात. याचा सर्वात पहिला परिणाम कोणावर होत असेल, तर तो घरातील लहान मुलांवर. आईचे प्रेम त्यांना मिळत नसल्याचे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.