लॉकडाऊनची घोषणा होताच फ्रान्समध्ये तब्बल 700 किमीची वाहतूक कोंडी


पॅरिस – कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले असून जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 कोटींच्या पार गेला आहे, तर या रोगामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तेथे पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पण लॉकडाऊनची घोषणा होताच तेथील नागरिकांची तारांबळ उडाली आणि लोकांना खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

लॉकडाऊनची घोषणा होताच पॅरिसमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तब्बल 700 किमी लांबीची वाहतूक कोंडी झाली आहे. मोठ्या संख्येने लोक अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी आणि शहराबाहेर जाण्यासाठी पडल्याचे म्हटले जाते आहे. फ्रान्समध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा अत्यंत कमी आणि संक्रमणाचा वेग दुप्पट असल्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करावी लागली आहे.


बुधवारी आपल्या देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केली. शाळा आणि काही कामाची कार्यालये या लॉकडाऊन दरम्यान सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या नवीन गाईडलाईन्स जाहीर करण्यात आहेत. त्यातच युरोपमधील रुग्णालये आता कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे अपुरी पडत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे सध्या फ्रान्समध्ये कोरोनाशी लढण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. देशभरात शुक्रवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे.