महाराष्ट्रात ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट पुढील काही दिवसांत येण्याची भीतीही केंद्र सरकारच्या समितीने व्यक्त केल्यामुळे लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, ‘मिशन बिगिन अगेन’तंर्गत सुरू केलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.

मार्च महिन्यात राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिने लॉकडाउन कायम ठेवल्यानंतर एक एक सेवा पूर्ववत सुरू केली जात आहे. राज्य सरकारने यासाठी मिशन बिगिन अगेन (पुनश्च हरिओम) कार्यक्रम जाहीर करत टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली. राज्यातील अनेक सेवा व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असले, तरी कंटेनमेंट झोन व कोरोना उद्रेक झालेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम ठेवण्यात आलेला आहे.