आजपासून ‘पब्जी’चे भारतातील दुकान कायमचे बंद


नवी दिल्ली – आजपासून पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाइट भारतात पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे दिल्यामुळे पब्जीच्या चाहत्यांसाठी ही बातमी निराशाजनक आहे. एक महिन्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील ११८ चीनी अॅप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. त्यात बहुचर्चित पब्जी या मोबाईल गेमचा देखील समावेश होता.

भारताने चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता चीनी अॅप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. कंपनीने याबाबत फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही आमच्या युझर्सच्या डेटाचे संरक्षण करण्याला नेहमीच प्रथम प्राधान्य दिले आणि भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे आम्ही नेहमीच पालन केले आहे. आमच्या गोपनीयता धोरणात जाहीर केल्यानुसार सर्व युझर्सची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. या निर्णयाबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि पब्जी मोबाइलसाठी भारतात दिलेले समर्थन आणि प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. टेन्सेंन्ट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली आहे.

तुम्ही मोबाईलमधील एपीके जर इन्स्टॉल केले असेल तरीही आता पब्जी गेम खेळता येणार नाही. पब्जीच्या मालकांना सर्व प्रकाशित अधिकार परत करण्यात आले आहेत. कोरोना लॉकडाऊन काळात पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाइटवर युजर्सची संख्या वाढल्यानंतर यावर बंदी आणली गेली. पब्जी मोबाईल गेमच्या एकूण युजर्सच्या संख्येत भारताचा वाटा २५ टक्के होता. या अॅप्सवर भारतात बंदी आणल्यानंतर चीनच्या या कंपनीचा बाजार भाव जवळपास ३४ अब्ज डॉलरने घसरला. भारतात टेन्सेन्ट पब्जी अॅपच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करत होती. या कंपनीला दररोज तब्बल ३ कोटी सक्रिय युजर्स जोडले जात होते.