आरक्षणासंदर्भात नितीश कुमारांचे मोठे वक्तव्य


पाटणा – जातींसाठी लोकसंख्येवर आधारित आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केले आहे. पण त्यांनी लोकसंख्येची योग्य माहिती उपलब्ध असेल तरच त्याची अमंलबजावणी करता येऊ शकते, असेही म्हटले आहे. वाल्मिकीनगरमधील जदयूचे खासदार वैद्यनात महतो यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून नितीश कुमार यानिमित्ताने आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

जिथपर्यंत लोकसंख्येचा प्रश्न आहे तो निर्णय जनगणना झाल्यानतंरच घेऊ शकतो. आपल्या हातात तोपर्यंत निर्णय नाही. आरक्षण जातींच्या लोकसंख्येच्या आधारे असावे, यात आमचे कोणतेही दुमत नसल्याचे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. यावेळी जातीनिहाय लोकसंख्येची गणना व्हावी का यासंबंधी नितीश कुमार यांनी स्पष्ट भाष्य केले नाही. याआधीही ही मागणी नितीश कुमार यांनी केली आहे.

मला १५ वर्ष त्यांची सेवा करण्याची लोकांनी संधी दिली. पुन्हा त्यांनी संधी दिली तर लोकांमध्ये जाऊन दखल न घेतलेल्या समस्यांबद्दल चर्चा करुन त्यांच्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासन नितीश कुमार यांनी यावेळी दिले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, अत्यंत मागासवर्ग आणि महादलित यांच्यासह समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल यासाठी आपल्या सरकारने प्रयत्न केल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.

यावेळी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरुन आरजेडीवर नितीश कुमार यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर त्यांनी तेजस्वी यादव यांनी दिलेल्या १० लाख रोजगाराच्या आश्वासनांचीही खिल्ली उडवली. नितीश कुमार यावेळी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सहाय्याने आपण बिहारच्या विकासासाठी काम केल्याचा उल्लेख केला.