तुम्ही शरद पवारांना भेटा; राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला


मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजभवनावर पोहोचले होते. राज ठाकरेंनी यावेळी राज्यपालांसमोर वाढीव वीज बिलाचा मुद्दा मांडत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. यावेळी राज्यपालांनी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला राज ठाकरेंना दिला. राज्यपाल भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. लवकरच शरद पवारांना आपण भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राज्यपालांशी लोकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलासंदर्भात चर्चा केली. माझा पक्ष, कार्यकर्ते गेली अनेक दिवस प्रकरणी आंदोलन करत आहेत. अदानी, बीएसटीचे लोक याप्रकरणी भेटून गेले. आम्ही वीज बिल कमी करु शकतो पण एमईआरसीने आम्हाला मान्यता दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. एमईआरसीच्या लोकांना पक्षाचे एक शिष्टमंडळ जाऊन भेटून आले. त्यांच्याकडून लेखी स्वरुपात पत्र आले. वीज बिलं कमी करण्यासंदर्भात कंपन्या निर्णय घेऊ शकतात. आमचे त्यांच्यावर दडपण नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे कंपन्या एका बाजूला एमईआरसीकडे बोट दाखवत आहेत, तर दुसरीकडे आमचं काही दडपण नाही असे एमईआरसी म्हणत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले.

माझे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाले. लवकरात लवकर निर्णय घेऊ त्यांनी सांगितले, पण तो अजून होत नाही. राज्यपालांना भेटल्यानंतर त्यांनी शरद पवारांशी एकदा बोलून घ्या, असे सांगितले. पवार साहेबांसोबत मी बोलणार आहे. हा विषय राज्य सरकारला माहिती आहे, असे मला वाटते. लोकांना जिथे २०० बिल येत होते तिथे १० हजार बिल येत आहे. याची माहिती राज्य सरकारला आहे तर मग प्रकरण कशात अडकले हेच कळायला मार्ग नसल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे.

तात्काळ याचा निर्णय घ्यायला पाहजे. त्याच्यासाठी पहिले निवेदन राज्यपालांना दिले आहे. शरद पवारांशी फोनवरुन किंवा प्रत्यक्षात जाऊन चर्चा करणार. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार त्यांना हा विषय माहिती नाही असे नाही. अर्थात त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली की त्यावर काम सुरु आहे, असे ते सांगतात पण त्यावर निर्णय होत नसल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला.

कोरोना संकट काळात अनेकांचे रोजगार गेले, पैसे नाहीत त्यात बिल कसे भरणार? एका छोट्या निर्णयासाठी एवढे दिवस लागणार याला काय अर्थ आहे. निर्णय एक दोन दिवसात घ्यावा अशी विनंती आहे. राज्यपाल देखील बोलतील, पण सरकार आणि राज्यपालांचे फार सख्य असल्याने विषय किती पुढे जातील कल्पना नाही. पण ते सरकारसमोर गोष्ट मांडतील, अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.