राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालनियुक्त 12 जागांसाठी प्रस्ताव मंजूर


मुंबई: गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यामुळे आता महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रितसर प्रस्ताव पाठवला जाईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या जागा भरण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या गोटात हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानुसार विधानपरिषदेवर स्वत:ची वर्णी लावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाली होती. काँग्रेस पक्षाकडून यापैकी नामनिर्देशीत विधान परिषदेची उमेदवारी सचिन सावंत यांची निवड झाल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. आपल्या राजकीय नेत्याला काँग्रेस राज्यपाल निर्देशित उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वी महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवेळी संघर्ष झालेला पाहायला मिळाला होता. जून महिन्यात सध्याच्या १२ जागाही भरल्या जाणे अपेक्षित होते. पण कोरोना परिस्थितीचे कारण देत राज्यपालांनी या नियुक्त्या पुढे ढकलल्या होत्या. पण यावेळी महाविकास आघाडीने १२ जागा भरायचा, असा चंग बांधल्यामुळे राज्यपालांनी त्याला नकार दिल्यास पुन्हा एकदा संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.