राज ठाकरेंचा महाविकास आघाडीला टोला; कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही


मुंबई – आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. मुंबईत अनेक प्रश्न असून प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. पण आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. त्याचबरोबर सरकार कुंथत कुंथत चालवता येत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

वाढील वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. लवकरात लवकर वीज बिल कमी करण्यासंदर्भात निर्णय व्हावा अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी भेटीनंतर व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश रखडले आहेत. रेल्वे सुरू होत नाही, महिलांचे प्रश्न आहेत, सरकार कशासाठी कुंथत आहे हे समजत नाही. सरकार कुंथत कुंथत चालत नाही. रस्त्यावर वाहतुककोंडी होत आहे. रेस्टॉरंट सुरू झाली पण मंदिरे अद्याप उघडली नाही, राज्यात धरसोडपणा काय सुरू आहे हे समजत नाही. यावर नीट विचार करून सरकारने लोकांना एकदाच काय ते स्पष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज भेट घेतली. त्यांना त्यावेळी एक निवेदन दिले. लोकांना येत असलेल्या वीज बिलांसंदर्भात निवेदन दिले. मनसैनिक गेले काही दिवस सर्व ठिकाणी आंदोलन करत आहेत. माझी अनेकांनी भेट घेतली. अधिकाऱ्यांनी त्यावेळी आम्हाला वीज बिल कमी करू असे, आश्वासन दिले. परंतु एमईआरसीने मान्यता दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांची आमच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. आमच्याकडे त्यांचे लेखी पत्रही असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. वीज बिल कमी करण्याचा निर्णय कंपन्या घेऊ शकतात, त्यावर आमचे दडपण नसल्याचे एमईआरसीने सांगितले. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीही बोलणे झाले. राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिल्याचाही त्यांनी सांगितले. राज्य सरकारला हे माहित आहे तर सरकार कशावर अडले आहे हे माहित नाही. यावर सरकारने निर्णय घेतला पाहिजे. यावर शरद पवारांशी फोनवर अथवा प्रत्यक्षात भेट घेईन गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक महिने लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. असे विषय असताना अव्वाच्या सव्वा बिले येत आहेत. लोक कुठून बिल भरणार. सरकारने लोकांच्या भावना लक्षात घेता लवकरच निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. सरकार आणि राज्यपालांचे फारचे सख्य असल्यामुळे हा विषय किती पुढे जाईल याची कल्पना नाही. ते राज्याचे प्रमुख म्हणून सरकारसमोर विषय मांडतील अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.