स्टार प्रचारक  स्मृती इराणी करोनाच्या विळख्यात

फोटो साभार मातृभूमी

बिहार निवडणुकीतील स्टार प्रचारक जोमाने आपापल्या पक्षांचा प्रचार करत असतानाच करोनाने त्याची उपस्थिती लक्षणीय बनविली आहे. बड्या बड्या नेत्यांना आपल्या चपेट मध्ये घेणाऱ्या करोनाने आता केंद्रीय महिला बाल कल्याण आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यानाही त्याच्या विळख्यात घेतले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विट करून त्यांना करोना संक्रमण झाल्याचे सांगितले आहे.

आपल्या ट्विट मध्ये इराणी लिहितात, याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे हे मला समजत नाहीये त्यामुळे मी अगदी साध्या शब्दात सांगते की माझी कोविड १९ चाचणी पोझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वानी त्यांची चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी.

भाजपच्या अनेक नेत्यांना बिहार प्रचारादरम्यान करोनाचा प्रसाद मिळाला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी करोनामुळे पटना एम्स मध्ये आहेत तर स्टार प्रचारक शाहनवाज हुसेनसुद्धा एम्स मध्ये दाखल आहेत. मुख्य निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत करोनावर उपचार घेत आहेत तर केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यानाही करोना झाला आहे.

स्मृती इराणी यांनी बिहार मध्ये अनेक प्रचारसभा घेतल्या असून त्यापूर्वी गुजराथ पोटनिवडणूक प्रचारात त्या सहभागी झाल्या होत्या.