VIDEO VIRAL; वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी चिराग पासवान यांचा सराव


नवी दिल्ली – बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपले भाषण आणि नितीश कुमार यांच्यावर करत असलेल्या टीकेमुळे लोक जनशक्ति पार्टीचे नेते चिराग पासवान यांची चर्चा रंगली होती. त्यातच आता चिराग पासवन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. चिराग हे ज्यामध्ये त्यांचे वडील स्वर्गीय रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषणाचा सराव करताना दिसत आहे.


चिराग पासवान यांचा वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सराव करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने चिराग पासवान नाटक करत असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला आहे. चिराग हे व्हिडीओमध्ये रामविलास पासवान यांच्या फोटो समोर उभे राहून भाषणाची तयारी करत असल्याचे दिसत आहे. चिराग यांच्या आजुबाजूला कॅमेरामन आणि इतर काही लोक होती. ते त्यांना काही सूचना करत होते. काही ओळी म्हटल्यानंतर ते पुढे काय म्हणायचे ते विसरले आणि पुन्हा शूट करण्यास सांगू लागले.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्या पंखुरी पाठक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला आहे. तसेच अशी नौटंकी करणे हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. अशा नौटंकी लोकांमुळेच राजकारण हे बदनाम झाले असून जागरूकपणे लोकांनी आपला लोकप्रतिनिधी निवडून अशा लोकांना राजकारणाच्या बाहेरच काढले पाहिजे, असे पंखुरी पाठक यांनी म्हटले आहे.