विधान परिषदेवर राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेच्या या नेत्यांची वर्णी शक्य


मुंबई – राज्यपाल निर्देशित १२ आमदारांच्या विधान परिषदेवरील नियुक्त्यांना मुहूर्त मिळाला असून राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी (ता. २९) होणाऱ्या बैठकीत सदस्यांच्या शिफारशीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना बहाल करण्यात येणार आहेत. कुणाच्याही नावाचा या शिफारस करण्याच्या प्रस्तावामध्ये उल्लेख असणार नाही. दरम्यान, १२ सदस्यांच्या यादीमध्ये नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेनेच्या वतीने मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, सचिन अहिर तर काँग्रेसतर्फे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, सचिन सावंत यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाने अधिकार बहाल करण्याचा ठराव पारित केल्यावर १२ किंवा त्यापेक्षा कमी सदस्यांची नावे मुख्यमंत्री राज्यपाल महोदयांना कळवतील. त्याच दिवशी किंवा नंतरसुद्धा ते राजभवनला कळवू शकतात, अशी माहिती एका मंत्र्याने दिली. दरम्यान, आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली असून ती उद्या ठेवण्यात आली आहे. विधान परिषदेच्या १२ जागा जून महिन्यापासून रिक्त आहेत. आमदारांच्या नियुक्त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबल्या आहेत. त्यातच सध्या राजभवन व ‘मातोश्री’ यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. राज्यपाल त्या पार्श्वभूमीवर शिफारस डावलतात की मंजूर करतात, याची मोठी उत्सुकता आहे. मुंबईचे आणि त्यात तीन मराठा उमेदवार देण्यास काँग्रेसमधून विरोध आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीला तक्रारी केल्याचे समजते.

सध्या राज्यपाल बॅकफूटवर असून त्यांच्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांची पंतप्रधानांकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तक्रार केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची चांगलीच धुलाई केली. परिणामी राज्यपाल १२ सदस्यांच्या निवडीची मंत्रिमंडळ शिफारस डावलणार नाहीत, असा आघाडीच्या नेत्यांचा अंदाज आहे.

आमदारकीसाठी महाविकास आघाडीतील चर्चेत असणारे चेहरे
१. शिवसेना : सुनील शिंदे, सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, शिवाजीराव आढळराव-पाटील
२. काँग्रेस : नसीम खान, सचिन सावंत, मोहन जोशी, ऊर्मिला मातोंडकर, सत्यजित तांबे, आशिष देशमुख, चारुलता टोकस, रजनी पाटील
३. राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, शिवाजी गर्जे, अदिती नलावडे.