पुढील काही दिवसांत सर्वसामान्य देखील करु शकणार लोकल प्रवास


मुंबई – गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणाऱ्या लोकलमधून महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना देखील लवकरच प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता असून ट्विटरवर एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल, असे म्हटले आहे.

एका प्रवाशाने ट्विट करत, महिलांना लोकलने प्रवास करण्याची याआधी परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणे खूप मोठा अन्याय असल्याची खंत व्यक्त केली. यावर उत्तर देताना पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. यासंबंधी चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.


विजय वडेट्टीवार यांनी याआधी महानगर प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर रेल्वे प्रवासाची सर्वाना मुभा देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती दिली होती. विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती. यावेळी उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांना खुली करण्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी कोरोनाच्या परिस्थितीत टप्प्याटप्प्याने लोकांना प्रवासाची परवानगी द्यावी, अशी सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली.