बॅरन ट्रम्प १५ मिनिटात करोना मुक्त झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

जगाला ग्रासलेल्या करोनाची तिसरी लाट अमेरिकेत आल्याची चर्चा सुरु असतानाचा अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी त्यांचा मुलगा बॅरन ट्रम्प अवघ्या १५ मिनिटात करोना मुक्त झाल्याचा दावा केला आहे. अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलेनिया यांनाही करोना बाधा झाली होती आणि आता करोनाच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा अमेरिकेत करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत चालल्याचे दिसत आहे.

त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पेनसिल्वानिया येथील मार्टीनसबर्ग प्रचार सभेत बोलताना ट्रम्प यांनी पत्नी मेलेनिया व १४ वर्षीय बॅरन ट्रम्प याना झालेल्या करोना संसर्गाची माहिती दिली. ते म्हणाले, बॅरनची प्रतिकारशक्ती खुपच मजबूत आहे. त्याची करोना टेस्ट पोझिटिव्ह आल्याचे डॉक्टरनी सांगितल्यावर मी त्यांच्याशी चर्चा केली.  त्यानंतर १५ मिनिटात मी डॉक्टरांची पुन्हा बोललो तेव्हा त्यांनी बॅरनचा करोना गेल्याचे सांगितले.

अमेरिकेत अध्यक्ष निवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होत असून ५० पैकी २९ राज्यात पुन्हा करोना प्रकोप झाला आहे. अमेरिकेत करोनामुळे एकूण ८८ लाख नागरिक संक्रमित झाले आहेत आणि मृतांची संख्या २ लाख ३० हजारावर आहे. गेल्या चोवीस तासात नवे ६० हजार रुग्ण सापडले असून पीडीअॅट्रिक अकॅडमीच्या माहितीनुसार येथे २२ ऑक्टोबर् पर्यंत ७ लाख २२ हजार मुलांना हा संसर्ग झाला आहे. हे प्रमाण एकूण करोनाग्रस्त रुग्णांच्या ११ टक्के इतके आहे.